नाशिक : जिल्ह्यात अवकाळीने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असला, तरी धरणांमधील जलसाठा गत आठवड्यापासून स्थिर आहे. सध्या जिल्ह्यांतील धरणांमध्ये एकूण १६ हजार १४४ दलघफू म्हणजेच २४.५९ टक्के, तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणांतही २,५0१ दलघफू अर्थात ४४ टक्के जलसाठा आहे.
मागील सोमवारी (दि. २) गंगापूर धरणात ४४.४२ टक्के जलसाठा होता. दर आठवड्याला सुमारे ४ टक्के जलसाठ्याचा उपसा होत असतो. मात्र, सोमवारी (दि. ९) देखील ४४ टक्केच जलसाठा असल्याने अवकाळीमुळे धरणांतील जलसाठा स्थिर असल्याचे दिसत आहे. यंदा मे महिन्यात उन्हाच्या काहिलीने जिल्ह्यांतील धरणसाठ्यांच्या पातळीत वेगाने घट होत होती. मे महिन्याच्या मध्यावर धरणसाठ्यांमध्ये २८ टक्के जलसाठा होता. पाऊस लांबला, तर जिल्हावासीयांपुढे पाण्याच्या दुर्भिक्षाचे संकट उभे राहिले असते. मात्र, ७ मेपासून अवकाळीने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यामुळे दर आठवड्याला जिल्ह्यांतील धरणासाठ्यांमध्ये २ टक्क्यांनी वाढ होत राहिली अर्थात हे २ टक्के पाण्याचा उपसा होत राहिल्याने जलसाठे स्थिर राहिले. सद्यस्थितीत जिल्ह्यांतील धरणांमध्ये १६ हजार १४४ दलघफू म्हणजेच २४.५९ ट़क्के जलसाठा आहे. त्यामुळे पुढील महिनाभर पुरेल इतके पाणी धरणांमध्ये शिल्लक आहे.
गंगापूर धरणसमूहात मागील वर्षी आजच्या दिवशी १७.६९ ट़क्के जलसाठा होता, जो आजच्या घडीला ३२.७४ इतका आहे म्हणजेच मागील वर्षीच्या साधारण दुप्पट आहे.
पालखेड धरणसमूहात मागील वर्षी साडेतीन टक्के होता, जो आज ११.२७ ट़क्के आहे. ओझरखेड धरणसमूह मागील वर्षी कोरडे ठाक पडले होते त्यात आज १५ टक्के जलसाठा आहे. गिरणा खोरे धरणसाठ्यातही २२ टक्के जलसाठा आहे. जो मागीलवर्षी केवळ ११.६६ टक्के इतका होता.
2025-06-10T10:54:50Z