BKC PEDESTRIAN SUBWAY : वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात होणार भूमिगत पादचारी मार्ग

मुंबई : बुलेट ट्रेनमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मेट्रो 3 भुयारी मार्गिकेपर्यंत पोहोचता यावे यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथे भूमिगत पादचारी मार्ग उभारण्यात येणार आहे. यामुळे सामानासह प्रवास करणार्‍या प्रवाशांना जमिनीखालीच स्थानक बदलता येणार आहे.

आरे ते कफ परेड या 33.5 किमीच्या मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचे बीकेसी येथील स्थानक बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्थानकापासून काही अंतरावर आहे. मेट्रो स्थानक प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयाजवळ आहे. बुलेट ट्रेन स्थानकातून बाहेर पडून रस्त्यावर येऊन मेट्रोपर्यंत प्रवास करण्यापेक्षा रस्तेमार्गे प्रवास करणे प्रवासी पसंत करतील. त्यापेक्षा या प्रवाशांना भुयारी मेट्रोकडे वळवणे आवश्यक आहे.

भूमिगत पादचारी मार्गामुळे बुलेट ट्रेनमधून आलेल्या प्रवाशांना बोगद्यातून बाहेर न पडता मेट्रो स्थानकात जाता येईल. परिणामी, मेट्रोची प्रवासी संख्या वाढवण्यास मदत होईल. भूमिगत पादचारी मार्गिकेचा काही भाग हा वाकोला नाल्याच्या खालून जाणार आहे. जमिनीखाली 12 मीटरवर ही मार्गिका तयार केली जाईल. साधारण 1.3 किमी लांबीचा हा बोगदा असेल.

तीन स्थानके जोडणार

भूमिगत पादचारी मार्गिकेचे नियोजन करण्यासाठी 1 जुलैला बैठक पार पडली. यानुसार बुलेट ट्रेन आणि मेट्रो 3 ही दोन स्थानके जोडली जातील. तसेच बुलेट ट्रेनचे स्थानक मेट्रो 2 ब मार्गिकेच्या बीकेसी डायमंड मार्केट स्थानकालाही जोडले जाईल. त्यामुळे मेट्रो 3 स्थानकातून बुलेट ट्रेन स्थानकात व तेथून पुढे मेट्रो 2 ब स्थानकात पोहोचणे शक्य होईल.

2025-07-06T04:39:36Z