नाशिक : राज्य शासनाच्या आदिवासी भागातील १,७९१ शिक्षक पदांच्या भरतीप्रक्रियेला आदिवासी संघटनांचा तीव्र विरोध असून, याविरोधात संघटना आता आक्रमक पवित्र्यात आल्या आहेत.
भरती प्रक्रियेविरोधात १३ जूनपासून 'बिर्हाड आंदोलन' छेडण्याचा निर्णय सोमवारी (दि.९) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
म्हसरूळ परिसरातील बोरगड येथील कंसारा मंदिरात ही बैठक घेण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये १,७९१ शिक्षक पदे भरली जाणार असून, यासाठी शासनाने २१ मे २०२५ रोजी ८४ कोटी ७४ लाख ५५ हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ही भरती प्रक्रिया खासगी कंपन्यांमार्फत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या कंत्राटी शिक्षकांवर बेरोजगारीची टांगती तलवार लटकली असल्याने राज्य रोजंदारी वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचारी संघटनेने शिक्षक भरतीस तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीस आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष लकी जाधव, ललितकुमार चौधरी, योगिताबाली पवार, पंकज बागूल, अंकुश चव्हाण, पंकज जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
2025-06-10T10:24:51Z