सातारा : महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मान सातार्याला मिळाला आहे. हे संमेलन सर्व ताकतीने यशस्वी होण्यासाठी सर्व सहकार्य माझ्याकडून राहील व सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना दूरध्वनीद्वारे दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकारामुळे सातार्यात संमेलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सातार्यात होणारे साहित्य संमेलन हे खा. उदयनराजे भोसले यांना बरोबर घेऊनच होणार आहे, असे कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलेे. सातार्यातील हे संमेलन उदयनराजे भोसले यांच्याशिवाय अधुरेच असून त्यांच्या सहभागाने या साहित्य संमेलनाची उंची वाढली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
खा. उदयनराजे भोसले यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये सहकार्याची आणि मार्गदर्शकाची भूमिका कायम ठेवली आहे. याबाबत बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, सातार्यात 99 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. साहित्य मेळा भरण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. यामध्ये सातारा लोकसभेचा खासदार म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही.
साहित्य उत्सवाचा महामेळा भरवणे हे कोणा एकाचे काम नाही. हा जगन्नाथाचा रथ आहे. हा रथ सर्वजण आपण सातारकर म्हणून एकत्रितपणे पुढे नेऊया. यामध्ये मी कोठेही कमी पडणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्याचा ग्रंथ महोत्सव दरवर्षी साहित्य परंपरेचा मेळावा भरवत असतो, त्याचा कळसाध्याय हा साहित्य संमेलनाच्या रूपाने साकार होत आहे. यामध्ये सर्व सातारकरांनी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आपापली जबाबदारी निश्चितपणे पार पाडावी, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
2025-06-10T01:06:31Z