वडापावमध्ये सापडले चक्क झुरळ ! पुणे विद्यापीठातील फूड मॉलमधील प्रकार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड मॉलमधील एका अन्नपदार्थ विक्रेत्याच्या वडापावमध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून, संबंधित फूड मॉलमधील खाद्यपदार्थ विक्रेत्याचे निलंबन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यापीठात विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ खाण्यासाठी फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. विद्यापीठाने फूड मॉल उभा करून या ठिकाणी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व इतरांनी अन्नपदार्थ खाण्यासाठी यावे, असे नियोजन केले आहे. विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीन, ओल्ड कॅन्टीन, ओपन कॅन्टीन अनेक वर्षांपासून बंद आहेत. परीक्षा विभागाजवळ आदर्श कॅन्टीन आणि फूड मॉल या दोनच ठिकाणी विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. त्यातही विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठातील फूड मॉलमधील एका दुकानदाराने विद्यार्थ्याला दिलेल्या वडापावमध्ये चक्क झुरळ आढळून आले. संबंधित विद्यार्थ्याने याबाबत विक्रेत्याकडे तक्रार केली. विद्यापीठ प्रशासनाकडेसुद्धा यासंदर्भात तक्रार करण्यात आली. आता विद्यापीठ प्रशासन, यावर काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

राहुल ससाणे, सदस्य, भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठविद्यापीठातील फूड मॉलमधील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या अन्नपदार्थामध्ये झुरळ आढळून आले. संबंधित विद्यार्थ्याने याबाबत भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीतील सदस्य या नात्याने माझ्याकडे तक्रार केली. विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सकस अन्नपदार्थ मिळावे, अशी आमची मागणी आहे. परंतु, सातत्याने निकृष्ट अन्न देऊन विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत आहे. कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि प्रभारी कुलसचिव यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.

2025-02-05T06:23:39Z