लोकशाहीच्या यशाचा काहींना त्रास!, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर टीका

पीटीआय, नवी दिल्ली : देशातील लोकशाही, तिच्या संस्थांचा काही लोकांना त्रास होत आहे. त्यामुळेच ते लोकशाहीवर हल्ले करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीबद्दल लंडनमध्ये केलेल्या विधानांवरून भाजपने त्यांना लक्ष्य केले असताना शनिवारी पंतप्रधानांनीही याबाबत भाष्य केले. ‘‘देश आत्मविश्वास आणि निर्धारपूर्वक वाटचाल करीत असताना आणि जगभरातील बुद्धिवादी भारताबद्दल आशावादी असताना, काही लोक नैराश्यपूर्ण चर्चा करतात. ते देशाविषयी वाईट मतप्रदर्शन करतात आणि देशाचे मनोधैर्य खच्ची करतात’’, अशी टीका मोदी यांनी केली.

  ‘‘भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. स्मार्टफोन डेटाचा वापर करण्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल निर्माता देश आहे आणि तिसऱ्या क्रमांकाची नवउद्यमी परिसंस्था आहे’’ असे मोदी यांनी सांगितले. भारत सध्या मजबूत स्थितीत आहे, असे जगभरातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, विचारवंत एकसुरात म्हणत आहेत, असा दावा मोदी यांनी केला.

  पूर्वी देशातील घोटाळय़ांच्या बातम्या व्हायच्या. आता भ्रष्टाचारी लोक आपल्याविरोधातील कारवाई टाळण्यासाठी एकत्र येतात, याच्या बातम्या होतात, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. सर्व सरकारांनी आपापल्या क्षमतांनुसार काम केले. आम्हाला परिवर्तन हवे होते. त्याप्रमाणे आम्ही भिन्न गतीने आणि भिन्न मोजमापावर काम केले, असेही ते म्हणाले. देशातील छोटय़ा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट अडीच लाख कोटी जमा झाल्याचा फायदा झाला, असा दावा करतानाच सरकार आपली काळजी घेते, असा विश्वास आता नागरिकांना वाटतो, आम्ही प्रशासन मानवी पद्धतीने हाताळतो असे, पंतप्रधान म्हणाले.

काहीतरी पवित्र घडत असते तेव्हा तीट (काळा टिळा) लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे बऱ्याच पवित्र गोष्टी घडत असताना काही लोकांना तीट लावण्याची जबाबदारी घ्यावी लागते.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

2023-03-18T19:24:06Z dg43tfdfdgfd