मध्यपूर्वेतील संघर्ष

बरोबर 52 वर्षांपूवी म्हणजे 1972 मध्ये पश्चिम जर्मनीतील म्युनिक येथे ऑलिम्पिक सुरू असतानाच ‘ब्लॅक सप्टेंबर’ या पॅलेस्टिनी जहाल संघटनेच्या दहशतवद्यांनी इस्रायलच्या दोन खेळाडूंना ठार मारले आणि आणखी नऊजणांना ओलीस ठेवून नंतर त्यांचीही हत्या केली. इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या 234 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी, या मागणीसाठी ‘ब्लॅक सप्टेंबर’ने हे कृत्य केले होते. जर्मनीच्या पोलिसांनी या दहशतवाद्यांचा खात्मा केला; मात्र बदला घेण्यासाठी लगेचच इस्रायलने सीरिया व लेबनानमध्ये पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या तळांवर हवाई हल्ले करून 200 दहशतवाद्यांचा खात्मा केला. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सुरू असून, त्याचवेळी इस्रायलने तेहरानध्ये लपलेला ‘हमास’चा प्रमुख इस्माईल हानिया याची मंगळवारी हत्या केली आणि 7 ऑक्टोबर 2023च्या ‘हमास’च्या कृत्याचा बदला घेतला.

गेल्या वर्षी पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर निर्दयी हल्ला केला. त्यात इस्रायलचे 1,200 लोक ठार झाले. आतापर्यंत गाझापट्टीत झालेल्या युद्धात इस्रायलने 39 हजार पॅलेस्टिनींना ठार मारले. दुसरीकडे ‘हिजबुल्लाह’ने ‘हमास’ची साथ करत, इस्रायलमधील अनेक भागांवर गोळीबार केला. ‘हिजबुल्लाह’ने उत्तर इस्रायल आणि गोलान टेकड्यांवर रॉकेटने आणि लष्करी तळांवर ड्रोनहल्ले केले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने लेबनानमध्ये ‘हिजबुल्लाह’च्या अनेक अड्ड्यांवर हवाई व तोफहल्ले केले. त्यामध्ये तीन-चारशे लोकांचा मृत्यू झाला, तर ‘हिजबुल्लाह’च्या बॉम्बहल्ल्यांमुळे इस्रायलमधील 33 लोकांचा मृत्यू होऊन, 60 नागरिकांना घर सोडावे लागले. यावर्षी या घटनांची पुनरावृत्ती सुरू झाली असून, ‘हिजबुल्लाह’ने इस्रायलवर नुकत्याच केलेल्या रॉकेट हल्ल्यात 12 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. त्याचा बदला घेण्यासाठी ‘हिजबुल्लाह’च्या कमांडरला लक्ष्य करून, इस्रायलने लेबनानमध्ये घुसून हवाई हल्ले केले आणि त्याच दिवशी हमासप्रमुखालाही लक्ष्य केले.

‘हिजबुल्लाह’ हा एक शिया इस्लामिक राजकीय पक्ष असून, ती लेबनानमधील एक निमलष्करी संघटनाही आहे. या संघटनेस इराणचा पठिंबा आहे. हसन नसरुल्लाह हा 1992 पासून ‘हिजबुल्लाह’चे नेतृत्व करतो. 40-45 वर्षांपूर्वी लेबनानवर इस्रायलने आक्रमण केले, तेव्हाच इराणच्या आशीर्वादाने ‘हिजबुल्लाह’चा उदय झाला. 2000 मध्ये इस्रायलने लेबनानमधून माघार घेतल्यानंतर ‘हिजबुल्लाह’ने ‘इस्लामिक रेजिमेंटस्’ या लष्करी पथकाची ताकद वाढवायला सुरुवात केली. या संघटनेचा समाचार घेतानाच आता हानियाला मारून इस्रायलने 7 ऑक्टोबरचा बदला पूर्ण केला आहे. ‘हमास’ने इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागली. त्यात 1195 लोक मारले गेले आणि 250 नागरिकांना ओलीस ठेवले गेले. यानंतर इस्रायलने हमासला उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आणि त्यानंतर गाझा पट्टीवर हल्ले करण्यास सुरुवात केली. गेल्या रविवारी इस्रायलच्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक गटाने पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू व संरक्षणमंत्री योव्ह गॅलंट यांना इस्रायलवरील हल्ल्याचा सूड घेण्याविषयीचे सर्वाधिकार बहाल केले होते. लेबनानमधील हिजबुल्लाहप्रमाणेच ‘हमास’लाही इराणचे समर्थन आहे; मात्र इस्रायलने आमच्यावर हल्ले केल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणने दिलेला होता. लेबनानमधून हल्ला झाल्यावर त्याचा प्रतिकार म्हणून इस्रायलने बैरूटवर हवाई हल्ले केले आणि आता ‘हमास’च्या प्रमुखालाच टिपल्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. आता इराणही स्वस्थ बसणार नाही. इराणने जहाल पवित्रा धारण केल्यास लेबनानमध्येही प्रक्षोभ निर्माण होईल आणि इस्रायलही पुन्हा प्रतिहल्ले करण्याची शक्यता आहे.

हानियाने गाझापट्टी 2019 मध्येच सोडली होती. त्यानंतर तो कतारमध्ये गेला होता. 1948 मध्ये पॅलेस्टाईनमधून जे विस्थापित झाले, अशा निर्वासितांच्या कुटुंबांच्या वंशजांपैकी हानिया एक. 2006 मध्ये पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या संसदेच्या निवडणुकीत ‘हमास’चा विजय झाला, त्यावेळी हानिया ‘हमास’चा प्रमुख असल्यामुळेच पॅलेस्टाईनचा पंतप्रधानही झाला; परंतु पुढच्याच वर्षी ‘पॅलेस्टाईन नॅशनल ऑथॉरिटी’चे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी हानियाला पंतप्रधानपदावरून हाकलले. ‘फतह’ आणि ‘हमास’ या राजकीय पक्षांमध्ये संघर्ष सुरू असल्यामुळे हानियाने अब्बास यांचा आदेश मानलाच नाही आणि पंतप्रधानपदाचे अधिकार तो गाजवतच राहिला. हानिया 2006 पासून 2017 पर्यंत ‘हमास’चा नेता होता. नंतर हानियाची ‘हमास’च्या पोलिटिकल ब्युरोचा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यानंतर याह्या सिनवरने त्याची जागा घेतली. सिनवरने 1989 मध्ये इस्रायली सैनिकांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्याचा कट अमलात आणला होता. त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊन 22 वर्षे तो तुरुंगात होता. अमेरिकेनेही त्याला ‘दहशतवादी’ घोषित केले आहे. आता हानियानंतर सिनवर हा इस्रायलच्या टार्गेटवर असेल.

नेतान्याहू यांनी नुकतीच अमेरिकेला भेट देऊन, तेथील संसदेत भाषण केले. शत्रूंवर संपूर्ण विजय मिळवण्याचा निर्धार त्यांनी केला असून, त्यासाठी अमेरिकेकडून अधिकाधिक शस्त्रे व अर्थसाह्याची मागणी त्यांनी केली. इस्रायलचे दीडशे ओलीस अद्याप ‘हमास’च्या ताब्यात आहेत. युद्ध आणि हिंसाचार संपवा आणि वाटाघाटी करून ओलिसांची सुटका करा, अशी मागणी ओलिसांचे कुटुंबीय करत आहेत. इस्रायलमधील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने रस्त्यावर येऊन नेतान्याहू यांच्या युद्धखोर धोरणांचा निषेध करत आहेत. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने इस्रायलविरुद्ध नरसंहाराची केस दाखल करून घेतली आहे. इस्रायलच्या आक्रमकतेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रत्यक्षपणे मदत केल्यामुळे डेमॉक्रॅटिक पक्षालाही त्याची झळ पोहोचली आहे. ‘हमास’सारख्या कट्टरतावादी संघटनेस वेसण घातलीच पाहिजे; परंतु त्याचवेळी गरज आहे इस्रायलच्या युद्धखोरीसही आळा घालण्याची. युद्धाची किंमत शेवटी निरपराध सामान्य नागरिकांनाच मोजावी लागते. मध्यपूर्वेत अशांतता निर्माण झाल्यास त्याचे आर्थिक-सामाजिक परिणाम शेवटी जगाला भोगावे लागतील.

2024-08-01T00:29:58Z dg43tfdfdgfd