दापोली मतदार संघात राष्ट्रवादी संपवण्यासाठी शिंदे व ठाकरे सेनेची पावले

खेड ; अनुज जोशी राज्यात विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला बाजूला करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादीचे अस्तित्वच दापोली विधानसभा मतदार संघात संपवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना पावले उचलत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राष्ट्रवादी सोबत आघाडी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली होती. केवळ राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे सध्या लक्ष लागून राहिले आहे ते खेड मध्ये. त्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्याच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना या पक्षात पडलेले दोन गट प्रबळपणे खेडच्या मैदानात एक मेकांसमोर शड्डू ठोकून शक्ती प्रदर्शन करत आहेत.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले. यानंतर दि.५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये विराट सभा घेऊन आपल्या संतापला वाट मोकळी करून दिली. मात्र यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला धक्का न लावता थेट दापोली मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदारकीचे उमेदवार संजय कदम यांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आणि राष्ट्रवादीला शह दिला.

संजय कदम हे जरी मूळचे शिवसैनिक असले तरी त्यांना पहिले विधानसभेचे तिकीट राष्ट्रवादीने देऊन आमदार म्हणून निवडून आणले होते. मात्र त्यानंतर त्यांचा शिवसेना उमेदवार योगेश कदम यांनी पराभव केला. सातत्याने त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत संजय कदम हेच राष्ट्रवादीचा चेहरा या मतदार संघात नेतृत्व करताना दिसत होते. मात्र त्यांनाच आता उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षात घेतल्याने आता संजय कदम हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिव बंधनात बांधले गेले आहेत.

त्यांच्या आकस्मिक पक्षांतराने राष्ट्रवादीची या मतदार संघात आगामी सर्व निवडणुकात पिछेहाट होण्याची शक्यता दिसत आहे. यापूर्वी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्याची भाषा करणारे संजय कदम आता भगवा फडकवणे आणि मशाल पेटवण्याची भाषा करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे जरी राष्ट्रवादी – काँग्रेस बरोबर आघाडीची भाषा करत असले तरी खेड येथे त्यांच्या झालेल्या सभेत केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकच चित्र दिसत होते.

तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने खेडमध्ये आज (रविवार) निष्ठावंतांचा एल्गार सभा आयोजित करण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. या सभेत देखील अनेकांचे प्रवेश शिवसेनेत होणार आहेत. परंतु उपलब्ध माहितीनुसार त्यामध्ये सुमारे ९० टक्के प्रवेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे असल्याचे समजते. त्यामुळे दापोली, खेड, मंडणगड या मतदार संघात दोन्ही शिवसेना मिळून राष्ट्रवादीचे अस्तित्वच संपवतात की काय, असे चित्र निर्माण होऊ लागले आहे. दापोली मतदार संघात त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली असून, आधी आघाडीचे कोकणातील भवितव्य स्पष्ट करा नंतर लढण्याच्या वार्ता करा, असा दबका आवाज आता उमटू लागला आहे.

संजय कदम राष्ट्रवादीत असताना जिल्हापरिषद पंचायत समिती, नगर पालिका, नगरपंचायत निवडणुका काही प्रमाणात राष्ट्रवादीने जिंकल्याचा इतिहास आहे. परंतु आता संजय कदम उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्याने आणि उद्धव ठाकरे यांना त्यांचे संघटन मोठे करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे लागणार असल्याने राष्ट्रवादीला त्यांच्याकडून कोणते स्थान दिले जाईल हे पाहणे भविष्यात औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्यातरी कोकणातील दापोली मतदार संघात उद्धव सेना व शिंदे सेनेची वाटचाल राष्ट्रवादी संपवण्याच्या दिशेने होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : 

The post दापोली मतदार संघात राष्ट्रवादी संपवण्यासाठी शिंदे व ठाकरे सेनेची पावले appeared first on पुढारी.

2023-03-19T08:58:25Z dg43tfdfdgfd