दुर्घटनेचे राजकारण

प्रयागराजच्या महाकुंभासाठी देशभरातून भाविकांचे जत्थेच्या जत्थे आजही रवाना होत आहेत. 26 फेब-ुवारीपर्यंत चालणार्‍या या उत्सवात 40 कोटी लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी अमृतस्नानासाठी करोडो भाविक आले. त्या ठिकाणी ब-ाह्म मुहूर्ताच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला व 60 जण जखमी झाले. या आकस्मिक आणि भयंकर घटनेने कुंभमेळ्याला काहीसे गालबोट लागले. दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला असून, महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती हर्षकुमार यांनी दिली आहे. एवढी भीषण दुर्घटना होऊनही त्याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत का बोलत नाहीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा का मागत नाहीत, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. या घटनेवरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. बजेटपेक्षा कुंभ ही महत्त्वपूर्ण घटना आहे. तेथे शेकडो लोक कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी भटकत असताना, केंद्रीय मंत्री मात्र स्नानाचा आनंद लुटत आहेत, अशी टीका समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी केली. मात्र, जनतेने विरोधी सदस्यांना निवडून दिले आहे, ते सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्यासाठी वा घोषणाबाजीसाठी नव्हे, तर चर्चा करण्यासाठी, असे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी बजावले आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचा खरा आकडा सरकार लपवत आहे, असा आरोप राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. मात्र, ते काहीही असले, तरी महाकुंभामुळे केवळ उत्तर प्रदेशचेच नव्हे, तर देशातील धार्मिक पर्यटन वाढले आहे.

विदेशांतून येणार्‍या पर्यटकांच्या संख्येतही 21 टक्के वाढ झाली आहे. बि-टन, अमेरिकेतून तर लाखो पर्यटक आले असून, या निमित्ताने ते देशातील अन्य शहरांना तसेच तीर्थक्षेत्रांनाही भेट देत आहेत. वास्तविक ही दुर्घटना टाळता आली असती, तर बरे झाले असते. पण, या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने तत्काळ सुरक्षा व्यवस्थेत आणखी सुधारणा केली आहे. ज्या ठिकाणी अगणित लोकांचा मेळा जमतो, तेथे जाणीवपूर्वक अशी दुर्घटना कोणी घडू देईल काय? अनेक दिवस चालणार्‍या महाकुंभात काही दिवस हे शुभ मानले जातात व त्यावेळी गर्दीला उधाण येते. पवित्र स्नान केल्याने सगळी पापे धुतली जातात आणि मोक्ष मिळतो, असा समज आहे. पण, भाविकांची संख्या अतोनात वाढल्यास, एखादी छोटी चूकही महागात पडू शकते, ती कशी हे दुर्घटनेवरून स्पष्ट झाले आहे. कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था, झालेला प्रचार आणि कुंभाचे महत्त्व हे गर्दी वाढण्यामागील कारण आहे. देशातील 20 शहरांमधून महाकुंभासाठी थेट हवाई सेवा उपलब्ध आहे. 13 हजार रेल्वे आणि 3300 विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाकुंभाच्या परिसरात 1 लाख 60 हजार तंबू, दीड लाख स्वच्छतागृहे आहेत. तसेच 50 इस्पितळे उभी करण्यात आली असून, एक हजार डॉक्टर तैनात आहेत. आतापर्यंत 2 लाख रुग्णांनी बाह्य रुग्णसेवेचा फायदा घेतला आहे. पवित्र धार्मिक कार्य व स्नानासाठी जाणार्‍या भाविकांच्या सुरक्षेसाठी 50 हजार पोलिस कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत; मात्र एवढी काळजी घेऊन आणि चोख व्यवस्था असूनही त्रिवेणी संगमावरील दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला अपयश आले.

1954 मध्ये स्वातंत्र्यानंतरचा पहिलाच कुंभमेळा होता. त्यावेळी मौनी अमावस्येच्या दिवशीच भाविक मोठ्या संख्येने संगमावर आले. तेव्हा एका हत्तीमुळे चेंगराचेंगरी सुरू झाली. त्या दुर्घटनेत 800 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधानांसह राजकीय नेते व प्रसिद्ध व्यक्तींनी कुंभमेळ्यात स्वतः जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला होता. 1986 मध्ये हरिद्वारच्या कुंभमेळ्यातील ढकलाढकलीत 50 जणांचे प्राण गेले. तर 2003 मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यात साधू चांदीची नाणी वाटू लागल्याचे ऐकताच, तेथे हजारो लोक गोळा होऊन चेंगराचेंगरी झाली आणि 30 लोकांचा जीव गेला. 2010 सालच्या हरिद्वारच्या कुंभमेळ्यात साधू आणि भाविकांमध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यवसान हाणामारी व चेंगराचेंगरीत होऊन, पाच लोक मृत्यू पावले. 12 वर्षांपूर्वी तेव्हाचे अलाहाबाद, म्हणजे आजच्या प्रयागमध्ये रेल्वे स्थानकावरच भाविकांची इतकी गर्दी लोटली, की 40 जणांचे बळी गेले. कुंभमेळ्यात पूर्वीच्या काळातही दुर्घटना घडल्या, म्हणून यावेळी झालेल्या दुर्घटनेचे समर्थन करता येणार नाही. पण, यावेळच्या घटनेस एका अफवेचे कारण घडले. न्यायालयीन समितीचा अहवाल आल्यानंतर निश्चित माहिती कळेल. पण, अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली असेल, तर त्यावरून आपला समाज समूह म्हणून कसा वागतो हे स्पष्ट होते.

आपण सारासारविवेकाने वागत नाही हे खरेच आहे. धार्मिक ठिकाणी तरी शिस्तीने व संयमाने वागावे, हे आपल्याला कधी कळणार? त्याचवेळी महाकुंभमध्ये बड्या बड्या नेत्यांसाठी खास व्यवस्था आणि सामान्य भाविकांकडे दुर्लक्ष होत असल्यास, तेही योग्य नाही. तसेच दुर्घटनेचे वार्तांकन करणार्‍या काही पत्रकारांना प्रशासकीय दादागिरीचा सामना करावा लागला आणि माहिती दडपण्यात आली, हेही योग्य नव्हे. उलट सत्य माहिती देणे, हे उत्तर प्रदेश सरकारचे कर्तव्य आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी असंख्य भाविक गंगा-यमुना-सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर येणार याची कल्पना असूनही, नदीवरील 28 पैकी अनेक पूल बंद का ठेवण्यात आले होते? घाटावर येण्यासाठी व परत जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग का ठेवण्यात आले नाहीत? हे प्रश्न उरतातच. दुर्घटनेवरून सध्या सुरू असलेले राजकारण नक्कीच ते करणार्‍यांना शोभादायक नाही. ते थांबवले पाहिजे, शिवाय त्याबद्दलची नेमकी माहिती सरकारने समोर ठेवली पाहिजे. आता महाकुंभाच्या उर्वरित काळात तरी योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. तसेच नाशिकमध्ये दोन वर्षांनी होणार्‍या कुंभमेळयात अशा गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये, हे पाहिले पाहिजे.

2025-02-05T00:32:09Z