लोकसत्ता टीम
नागपूर: एमबीबीएस, एमडी असलेले जळगावच्या डॉ. जसवंत पाटील यांचे सुसज्ज रुग्णालय होते. परंतु, त्यांची आई आजारी पडल्यावर ॲलोपॅथीने आराम पडला नाही. आईची प्रकृती खालावली. सर्व प्रयत्न संपल्यावर त्यांनी होमिओपॅथी औषध दिले. यातून आई बरी झाली. त्यानंतर होमिओपॅथीचे शिक्षण घेऊन व ॲलोपॅथी- होमिओपॅथी औषधांची सांगड घालून ते रुग्णांवर उपचार करीत आहेत. हा प्रयोग फायदेशीर ठरत असल्याचा त्यांचा दावा आहे.
कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित होमिओपॅथी संशोधन समिटसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. पाटील पुढे म्हणाले, एमबीबीएस, छातीरोग विभागात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर मी केईएम रुग्णालयात अधिव्याख्याता म्हणून रूजू झालो. कालांतराने पदोन्नती झाली. हिंदूजा रुग्णालयात सेवेचा प्रस्ताव आला. परंतु आजारी आईच्या आग्रहामुळे जळगावला परतलो. स्वत:चे रुग्णालय सुरू झाले. आईला मधूमेहासह बरेच आजार होते. तिची प्रकृती खूपच खालावली. ती जीवनरक्षण प्रणालीवर आली. माझ्या देश- विदेशातील मित्रांशी संपर्क साधून आईच्या प्रकृतीविषयक ॲलोपॅथी उपचारावर सल्ले घेतले.
आणखी वाचा- चंद्रपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच मानवी अवयवांचे प्रदर्शन
दरम्यान, मला एका मित्राने होमिओपॅथीचे एक पुस्तक भेट दिले होते. त्यात आईला असलेल्या लक्षणासदृश्य स्थितीचे वर्णन होते. त्यातील होमिओपॅथीचे औषध वाचून ते आईला दिले. काही दिवसांतच आई बरी झाली. त्यानंतर एक हृदय विकाराचा रुग्ण माझ्याकडे आला होता. नातेवाईकांना एक महागडे इंजेक्शन तातडीने देण्याविषयी सांगितले. ते महाग असल्याने सगळे रुग्ण सोडून पळून गेले. रुग्णाचे काय करावे हा प्रश्न होता. शेवटचा पर्याय म्हणून एक होमिओपॅथीचे औषध रुग्णाला दिले. काही तासांतच रुग्ण सामान्य होऊ लागला.
हे होमिओपॅथीचे अनुभव माझ्यासाठी अद्भूत होते. त्यानंतर मी होमिओपॅथीवर वाचन करून रुग्णांना ॲलीओपॅथीसोबत याही औषध देत होतो. परंतु कुणाचाही आक्षेप नको म्हणून कालांतराने बीएएमएस केल्याचेही डॉ. पाटील म्हणाले. एका रुग्णाच्या छातीत दाब, शॉक दिल्यावही काही लाभ होत नव्हता. नातेवाईकांनाही त्याचा मृत्यू झाल्याबद्दल सांगितले. परंतु शेवटचा उपाय म्हणून एक होमिओपथीचे औषध त्याच्या तोंडात टाकून शेवटचा शॉक देऊन बघितला. कालांतराने इमू बॅगच्या मदतीने त्याचा श्वासही परतला, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
2023-03-19T09:24:25Z dg43tfdfdgfd