ग्रामगीता

-डॉ. अशोक कामत

एकेकाळी सांगण्या-ऐकण्याला, गाण्याला आणि त्यामुळे अभंग, भजनांना अर्थ होता. पुढे लोकमाध्यमे वाढली, बदलली. तो सारा वेध घेऊन, समाज परिवर्तन करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, त्यांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा आघाडीवर होते. त्यांनी देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकवटून संतसरणी अनुसरली. भारतात इंग्रजी राजवटीबरोबर ख्रिस्ती धर्मप्रसारकांची चळवळ आली. या मंडळींनीही वसतीगृहे, रुग्णालये उभारली; पण त्यामागे स्वधर्म प्रचाराचा उद्देश होता. गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांच्या कार्याला ही मर्यादा नव्हती. अज्ञानाचा अंधार दूर व्हावा, परस्पर स्नेह-सौहार्द वाढून ग्रामोद्धार करावा, अशी दृष्टी होती. तुकडोजी महाराज राष्ट्रसंत ठरले. ग्रामोद्धार हाच त्यांनी राष्ट्रोद्धाराचा पाया मानला. ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रंथ म्हणूनच श्रेष्ठ ठरला आहे. त्यांनी स्वत:विषयी एकदा सांगितले होते,

आम्ही पक्षियाप्रमाणें। नित्य नवें आमुचे जिणें।

उडो मनाचिया मागें। जिकडे नेई तिकडे वेगें।।

स्थिर न होयचि क्षणी। चित्त भ्रमें हे भ्रमणीं।

तुडक्या म्हणे तू घरटें। होय तेव्हां पांग फिटें।।

ही नित्यनूतनता केवळ इकडे-तिकडे भरारीची नव्हे. त्यात मनस्वी परिभ्रमण आहेच; शिवाय जनमनप्रवेशही आहे. संतसरणीचे भक्तिगान असून, त्यात वैश्विक शक्तीचे भान आहे. ते व्यवहारी साधू होते. त्यांच्या गळ्यात माळ असली, मुखी हरिनाम असले, तरी ते बुवा, महाराज नव्हते. ते सांगत, माझा मठ नाही, फड नाही, कुणी वारस नाही. जे काही आहे, ते सारे जनताजनार्दनाचे आहे. या संदर्भात त्यांचे मृत्युपत्र वाचण्यासारखे आहे. महाराजांना गाव हाच देव वाटला. त्यात राहणारा कष्टाळू माणूस हा त्यांच्या मनन-चिंतनाचा विषय राहिला. ‘ग्रामगीता’ हे त्यांच्या साऱ्या रचनेचे सारसर्वस्व होय. तो ग्रंथ गावकऱ्यांसाठी आहे; पण तो संप्रदायाचा ग्रंथ नाही. आधी प्रपंच नेटका करावा, मगच परमार्थाच्या गोष्टी बोलाव्यात, अशी परखड दृष्टी आहे. त्याचबरोबर ‘एकमेकां साहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।’ हा भाव आहे. त्यात नरदेहाची महती, विवेक आणि प्रयत्नवाद आहे.

2023-06-01T04:00:59Z dg43tfdfdgfd