-भानू काळे
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी आम्ही जगन्नाथ मंदिरात आलो. आमच्या हॉटेलच्या जवळच होते ते. पुरीचेच पूर्ण रूप जगन्नाथपुरी. हे हिंदूंसाठी पूर्वीपासून फार पवित्र स्थळ आहे. आद्य शंकराचार्यांनी देशाच्या चार कोपर्यांत स्थापन केलेल्या चार मठांपैकी एक इथे आहे. इतर तीन म्हणजे दक्षिणेतील शृंगेरी, पश्चिमेतील द्वारका आणि उत्तरेतील बद्रिधाम. चारधाम यात्रा म्हणतात तिच्यात यांचाच समावेश होतो. काही जण या चारांत शृंगेरीऐवजी रामेश्वरचा समावेश करतात; पण बाकीची तीन तीच.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी मी इथे आलो होतो त्यापेक्षा हा भोवतालचा परिसर बराच बदललेला दिसला. त्यावेळी मंदिराला लागूनच बरीच दुकाने होती, फेरीवाले होते. ते सगळे यावेळी दिसले नाही; त्यांच्यासाठी थोड्याशा अंतरावर पर्यायी जागा दिली गेली होती. वाहने लावण्यासाठी बरीच मोकळी जागा राखून ठेवलेली होती. साधारण दहा एकरांचा मंदिर परिसर स्वच्छ केलेला होता आणि कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये म्हणून चारी बाजूंनी उंच भिंत उभारली होती. पूर्वी देवळाभोवती होते तसे भिकारीही आता अजिबात नव्हते. अलीकडच्या काळात भारतातील बऱ्याच प्रमुख देवळांत झालेले हे काही चांगले बदल म्हणता येतील. दुसरा एक सर्वव्यापी बदल, जो चांगला की वाईट ही ज्याचे त्याने ठरवावे, म्हणजे जवळजवळ प्रत्येकाच्या हातात मोबाइल होताच आणि काहीजण त्या परिसरात फोटो किंवा सेल्फी काढत होते! आपल्या भेटीची साक्ष म्हणून जगभर पाठवण्यासाठी! एक-दोन कोपरे त्यासाठी मुद्दाम बनवल्यासारखे वाटत होते! अर्थात प्रत्यक्ष मंदिरात शिरण्यापूर्वी तो मोबाइल हातातल्या इतर सामानाबरोबर बाहेरच ठेवावा लागत होता. त्यासाठी व्यवस्थित स्टँड वगैरे होता. हल्ली सगळ्याच मोठ्या मंदिरांत सिक्युरिटीचे कडक सोपस्कार पार पाडावेच लागतात आणि तोही बदलत्या भारताचा एक भाग आहे.
देशभरातून लाखो हिंदू भाविक इथे वर्षभर येतच असतात. दोन-तीन दिवस मुक्काम करतात; दानधर्म करतात. हे भाविक आणि इथल्या वास्तव्यात त्यांनी केलेला खर्च म्हणजे येथील अर्थव्यवस्थेचा पायाच आहे. अर्थात देशातील इतरही तीर्थक्षेत्रांच्या बाबतीत हे खरे असावे.
साधारण बाराव्या शतकात अनंतवर्मन या गंग घराण्यातील राजाने उभारलेल्या या जगन्नाथ मंदिरापासून दरवर्षी आषाढ महिन्यात, म्हणजे साधारण जून-जुलैमधे, निघणार्या तीन किलोमीटरच्या रथयात्रेसाठी तर अक्षरश: लाखो भाविक येतात. रथ ओढायलाही अहमहमिकेने हजारो माणसे पुढे येतात. भारतातील ही सर्वांत मोठी रथयात्रा. यात्रेसाठी लाकडाचे प्रचंड मोठे आणि उत्तम नक्षीकाम केलेले तीन रथ तयार केले जातात; प्रत्येकी साधारण पन्नास फूट उंच आणि चाळीस फूट लांब. ते बनवायला साधारण दोन महिने लागतात. त्यासाठी कुठल्या जंगलातली कडूनिंबाची झाडे तोडायची, त्या लाकडाचे ओंडके महानदीतून कसे वाहून आणायचे, त्यांच्यापासून रथ कसे तयार करायचे, त्यांची सजावट कशी करायची हे सगळे परंपरेने ठरलेले आहे. सर्व कामांसाठी ठरलेली माणसे असतात आणि ते काम करायचा अधिकार पिढ्यानुपिढ्या चालत आलेला असतो. वर्षानुवर्षे हे सगळे अगदी अस्सेच चालत आले आहे. त्यात जरादेखील बदल केला जात नाही. परंपरेचे मुख्य सामर्थ्य सातत्यातच असावे.
येथील जगन्नाथ हे कृष्णाचे रूप असावे; पण काहीजण त्याला विष्णूचे रूपही मानतात. देवळाच्या साधारण तीनशे फूट उंच शिखरावरचे विष्णुचक्र आणि त्याच्याही वर उभारलेला फडफडता कापडी ध्वज लांबूनही दिसतो. रोजच तो बदलला जातो आणि त्यासाठी इतक्या उंचावर चढण्याचा खटाटोपही सेवेकरी श्रद्धापूर्वक करत असतात. देऊळ अशा प्रकारे बांधले आहे की त्याची सावली कधीच कुठे पडत नाही. देवळातील जगन्नाथ, बालभद्र म्हणजे बलराम आणि सुभद्रा या तीन भावंडांच्या मुख्य मूर्ती नेहमीप्रमाणे पाषाणाच्या किंवा धातूच्या नसून लाकडाच्या बनलेल्या आहेत. त्याही पुन्हा फक्त कडूनिंबाच्या लाकडापासूनच. कारण त्याला दमट हवेतही बुरशी लागत नाही आणि ते दिसायला काळसर असते. जगन्नाथाची मूर्तीदेखील काळ्या रंगाचीच आहे. बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती काहीशा उजळ रंगाच्या आहेत. मूर्ती कडूनिंबाची, गळ्यात माळा तुळशीच्या आणि मूर्तींवर द्यायचा लेप चंदनाचा हेही ठरलेले. जगन्नाथासमोर लावल्या जातात त्या विशिष्ट उदबत्त्यांचा सुगंधही ठरलेला आहे. तो खास सुगंध परिसरात सगळीकडे दरवळत होता. आयटीसी ही विख्यात कंपनी ‘मंगलदीप’ या त्यांच्या विख्यात ब्रॅंडखालील एक उत्पादन म्हणून या खास उदबत्त्या बनवते. देशातील सिगरेट्स बनवणारी ही सर्वांत मोठी कंपनी अशा उदबत्त्यादेखील बनवते ही गंमतच आहे! आणखी एक विशेष म्हणजे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नवीन कुमार पटनाईक यांनीच हा ब्रॅंड लॉंच केला होता! मुद्दाम नमूद करावी अशी आणखी एक बाब म्हणजे उदबत्त्यांच्या प्रत्येक पुड्यामागे दोन रुपये मुख्यमंत्र्यांच्या महिला सबलीकरण योजनेला दिले जातात आणि त्यांच्या उत्पादनातून दहा हजार स्थानिक गरीब महिलांना रोजगार मिळतो.
जगन्नाथाच्या मूर्तींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर बारा वर्षांनी त्या बदलल्या जातात; म्हणजे मूळ रूपात त्या जशा होत्या तशाच पुन्हा तयार केल्या जातात. सर्व जुन्या मूर्ती जमिनीत विशिष्ट जागी पुरल्या जातात आणि त्या ठरलेल्या जागेला ‘पाताळ’ असे म्हटले जाते. देवळातील या मूर्ती अपूर्ण आहेत; म्हणजे त्यांना कान, ओठ, नाक, पापण्या, हात व पाय नाहीत. यामागे एक कथा तिथे प्रचलित आहे. विश्वकर्मा, म्हणजे कारागिरांचा देव, जगन्नाथाची मूर्ती स्वतः घडवत होता. ती पूर्ण होईस्तोवर बघायची नाही अशी त्याने येथील राजाला सक्त ताकीद दिली होती. पण राजाला राहवेना. जिज्ञासेपोटी तो हळूच देवळात आला आणि मूर्ती बघू लागला. त्याची चाहूल लागताच विश्वकर्मा चिडला आणि काम अर्धवट सोडून निघून गेला. त्यामुळे मूर्तीवरून अखेरचा हात फिरवणे, फिनिशिंग टचेस देणे राहूनच गेले. योग्य वेळी योग्य गोष्टी होतात, खूप उतावीळ होऊ नये, संयम पाळणे खूप महत्त्वाचे आहे ही शिकवण लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी ही कथा प्रचलित केली गेली असेही म्हणतात.
नियमानुसार इथे फक्त हिंदूंना प्रवेश आहे आणि याची कडक अंमलबजावणी केली जाते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही १९८४ मध्ये या मंदिरात प्रवेश दिला गेला नव्हता, कारण त्यांचे पती फिरोज हे पारशी होते. विशेष म्हणजे त्यावेळी त्या पंतप्रधानपदावर होत्या, तरीही त्यांना प्रवेश नाकारण्याचे धाडस मंदिराच्या व्यवस्थापनाने केले होते याचेही विशेष कौतुक वाटते. असे दुसरेही एक उदाहरण एलिझाबेथ झिग्लर नावाच्या स्विस महिलेचे आहे. त्यांनी या देवळाला काही वर्षांपूर्वी पावणेदोन कोटी रुपये देणगी म्हणून दिले होते, पण तरीही त्या ख्रिश्चन असल्याने त्यांना इथे प्रवेश नाकारला गेला होता. पैशाच्या जोरावर जगात काहीही करता येते या प्रचलित समजाला छेद देणाऱ्या आणि म्हणूनच मला महत्त्वाचा वाटणाऱ्या या घटना होत्या.
आम्ही आत शिरलो तेव्हा मुख्य मंदिरात अपेक्षेप्रमाणे भाविकांची गर्दी उसळली होती. जगन्नाथपुरीच्या या एकाच देवळाच्या प्रांगणात मुख्य देऊळ सोडून इतरही देवळे आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी रांग लावावी लागते. बरेच भाविक तेही करत होते. पुजाऱ्यांची संख्याही नेहमीपेक्षा खूप जास्त वाटली. असे ऐकले इथे सुमारे सहा हजार पुजारी आहेत. देवळावर ज्यांची उपजीविका चालते अशांची संख्या तर सहज याच्या तिप्पट-चौपट असावी.
आम्ही फक्त मुख्य देवळात गेलो. सर्वाधिक गर्दी इथेच होती. उकाडाही खूप होता, पण रांगेतून पुढे सरकत राहिलो. धक्काबुक्की आणि दमछाक होतच होती आणि शेवटी दर्शन झाले तेव्हाही जेमतेम नमस्कार करण्याइतकाच अवधी मिळाला. अर्थात यात विशेष असे कोणालाच काही वाटत नाही कारण वर्षानुवर्षे हे सगळे अगदी अस्सेच चालत आले आहे.
2025-07-06T07:01:10Z