RAHUL GANDHI ON ELECTION : मतटक्क्याची खडाखडी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका लेखाद्वारे, राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप पुन्हा केल्यानंतर सुरू झालेले वादंग, म्हणजे जुन्या तिकिटावरील नवा खेळ आहे. राहुल यांनी नव्याने प्रश्न उपस्थित केले असले, तरी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच या प्रश्नांची उत्तरे दिल्याचे आयोगाने म्हटले आहे. मात्र, मूळ मुद्द्यांऐवजी आयोगाने तोंडाला पाने पुसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पारदर्शकतेची अपेक्षा असलेल्या आयोगाकडून गंभीर मुद्द्यांवर ‘सूत्रां’मार्फत माहिती देण्याचा प्रकार योग्य नाही. राहुल यांच्या ताज्या आरोपानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे-नेते प्रवक्ते काँग्रेसवर हल्ला चढवत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लेख लिहून राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मात्र, या सर्वांच्या मुळाशी असलेले निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी आणि सुधारणा यांबाबतचे मुद्दे बाजूला पडून परस्परांविरोधात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे हा विषय नेहमीच्या ‘तू तू-मैं मैं’च्या समेवर पोहोचला आहे. गांधी यांनी पूर्वी संसदेतही हा विषय उपस्थित केला होता. लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मते मिळविल्यानंतर काही दिवसांतच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झाले, त्या धक्क्यातून काँग्रेस पक्ष सावरलेला नाही, असा भाजपचा आरोप आहे.

आता पुन्हा बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या मतमतांच्या गलबल्याने याला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळत आहे. गांधी यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप घेतले आहेत. त्यामध्ये निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती समितीतून सरन्यायाधीशांना वगळल्याने निवडपद्धतीत सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा असल्याचा मुद्दा सरकारशी संबंधित आहे. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काही महिन्यांतच ४१ लाख मतदार वाढ हे संशयास्पद असल्याचा त्यांचा आरोप आहे. मतदानानंतर लगेच जाहीर झालेल्या टक्केवारीत नंतर मोठा फरक पडल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही चित्रीकरणाचीही मागणी त्यांनी केली आहे. राहुल यांच्या नव्याने आरोप केल्यानंतर भाजपचे नेते-प्रवक्ते निवडणूक आयोगाच्या बचावासाठी धावून आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या आरोपांना आयोगाने थेट उत्तर देऊन या प्रकरणावर पडदा टाकणे योग्य ठरेल. आयोगाने निवडणुकीबाबत अधिक पारदर्शकता निर्माण करणे गरजेचे आहे.

2025-06-10T08:06:10Z