Lakshya Sen in quaterfinals of badminton singles : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेनने बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनने नेत्रदीपक शैलीत भारताच्या एचएस प्रणॉयचा पराभव केला. त्याने प्रणॉयवर २१-१२ आणि २१-६ असा विजय मिळवला. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा लक्ष्य हा दुसरा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी पी कश्यपने २०१२ मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता लक्ष्यने १२ वर्षांनंतर मोठी कामगिरी केली आहे.
लक्ष्य सेनने पहिल्या सेटमध्ये अतिशय आक्रमक खेळ करत चमकदार कामगिरी केली. त्याने आपलाच देशबांधव एचएस प्रणॉयला कोणतीही संधी दिली नाही आणि सुरुवातीपासूनच आघाडी उभारण्यास सुरुवात केली. दरम्यान प्रणॉय त्याच्या लयीत दिसला नाही. लक्ष्य सेनने त्याला गुण घेण्याची एकही संधी दिली नाही. प्रणॉय त्याच्यासमोर टिकू शकत नव्हता. लक्ष्य सेनने पहिला सेट २१-१२ असा एकतर्फी जिंकून सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्येही पहिल्या सेटची पुनरावृत्ती झाली. लक्ष्य सेन आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत शानदार प्रदर्शन केले, त्याला प्रत्युत्तर देताना प्रणॉय हतबल होताना दिसला. त्यामुळे प्रणॉयला दुसऱ्या सेटमध्ये त्याला ६ पेक्षा जास्त गुणांची कमाई करता आली नाही. त्याचबरोबर लक्ष्य सेनने त्याला चुका करण्यास भाग पाडले. त्यानंतर लक्ष्यने नेत्रदीपक शैलीत दुसरा सेट २१-६ असा जिंकला.
हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 6 : मराठमोळ्या स्वप्नीलने रचला इतिहास; ‘या’ खेळाडूंनी केली निराशा
लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या पहिल्याच सामन्यात केविन कॉर्डनचा पराभव केला होता. पण ग्वाटेमालाच्या खेळाडूने कोपराच्या दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून माघार घेतली. यानंतर त्याचे सर्व निकाल ‘डिलीट’ करण्यात आले. अशा प्रकारे लक्ष्य सेनच्या पहिल्या विजयावर पाणी फेरले. यानंतर लक्ष्य सेनने संथ सुरुवात करून पुरुष एकेरीच्या एल गटात बेल्जियमच्या ज्युलियन कॅरेजचा पराभव केला. त्यानंतर गटाच्या सामन्यातच त्याने जोनाथन क्रिस्टीचा पराभव केला. यानंतर त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्याने क्रिस्टीचा २१-१२ आणि २१-१८ असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.
2024-08-01T16:05:33Z dg43tfdfdgfd