अहिल्यानगर : ऐतिहासिक व धार्मिक परंपरा असलेले, मोहरमनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या सवारींची ‘कत्तलची रात्र’ व विसर्जन मिरवणूक आज, रविवारी शांततेत पार पडली. या दोन्ही मिरवणुका प्रचंड रेंगाळल्या. सवारी विसर्जन मिरवणूक रात्री ९ वा. महापालिकेच्या जुन्या कार्यालयासमोरच रेंगाळलेली होती. कत्तलची रात्र मिरवणूक शनिवारी मध्यरात्री १२ वाजता सुरू झाली. रविवारी सकाळी ११.४५ वा. दोन्ही सवारी पुन्हा कोठल्यात पोहोचल्या. त्यानंतर दुपारी १२ वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर पारंपरिक मार्गाने रात्री उशिरा वेशीबाहेर पडली. बालिकाश्रम रस्त्याने सावेडी गावठाणात विसर्जन करण्यात आले. दोन्ही मिरवणुका पारंपरिक मार्गाने काढण्यात आल्या. त्यासाठी ८९१ पोलीस अधिकारी व कर्मचारी असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मध्यरात्री कोठलामधून छोटे इमाम व मंगलगेट हवेली भागातून बडे इमाम यांच्या सवाऱ्यांची ‘कत्तलची रात्र’ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पाच टेंभ्यांना परवानगी देण्यात आली होती. मध्यरात्री १२ वाजता मिरवणुकीस सुरुवात झाली. मंगलगेट हवेली-दाळ मंडई-तेलीखुंट- शहाजीरास्ता-मोचीगल्ली- जुना बाजार-अर्बन बँक रस्ता-आनंदी बाजार- कोर्टगल्ली- सबजेल चौक-जुनी महापालिका-पंचपीर चावडी-धरती चौक-हातमपुरा-रामचंद्र खुंट मार्गाने सवाऱ्या सकाळी पुन्हा आपापल्या जागी नेण्यात आल्या.
आज दुपारी १२ वाजता विसर्जन मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही सवाऱ्या खेळवत पारंपरिक मार्गाने नेण्यात आल्या. विविध ठिकाणी भाविकांकडून त्यावर फुलांची चादर चढविण्यात आली. सरबताच्या गाड्यांना जुन्या महापालिकेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. रात्री नऊनंतर सवारी दिल्लीगेट वेशीबाहेर पडली. रात्री उशिरा सावेडी गावात सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, दरवर्षी मिरवणूक रेंगळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षीही मिरवणूक रेंगाळली होती. यापूर्वी सायंकाळी सहाच्या सुमारास सवारी वेशीबाहेर पडत होती. किरकोळ दगडफेक कत्तलची रात्र मिरवणुकीपूर्वी काल सायंकाळी कोठला परिसरात दोन गटात किरकोळ वाद झाले. त्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा काही मुलांना मारहाण झाली. त्याच्या पर्यावसनातून कोठला परिसरातील एका दुकानावर किरकोळ दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
2025-07-06T16:50:11Z