मुंबई: विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही सुट्टीबाबत संभ्रम

मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रात अतिवृष्टीच्या धास्तीने मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती, याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने परिपत्रक प्रसिद्ध केले होते. मात्र मुंबई विद्यापीठ प्रशासन, उच्च शिक्षण विभागाकडून कोणतीही स्पष्ट सूचना व जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रक लागू न केल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही सुट्टीबाबत संभ्रम होता. बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक हे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन घरी परतले.

मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित, माध्यमिक व उच्च माध्यमिक (नर्सरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या) शाळांच्या व महाविद्यालयांच्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मंगळवार, ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केले होते. मात्र, सुट्टीबाबत मुंबई विद्यापीठ व जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रक न काढल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सुट्टीबाबत संभ्रम होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुंबईतील अनेक महाविद्यालयांनी ऑनलाईन तासिकांचा पर्याय निवडला व शिक्षकांना बुधवारी महाविद्यालयांत येऊन हजेरीपटावर स्वाक्षरी करण्याची मुभा दिली.

हेही वाचा : मुंबई महापालिकेचा मदतीचा हात, लोकलची ताटकळत वाट पाहणाऱ्यांना चहा – बिस्किटचे वाटप

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्याचे परिपत्रक मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले. मात्र, या परिपत्रकात उच्च शिक्षण विभाग व पदवी महाविद्यालयांचा उल्लेख नव्हता. मुंबई विद्यापीठाकडूनही कोणतीही स्पष्ट सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे सुट्टीबाबत शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात काही महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर सुट्टी जाहीर केली आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन तासिका घेतल्या. अनेकदा महाविद्यालयात आल्यावर सुट्टी जाहीर केली जाते. त्यामुळे आमच्यासह विद्यार्थ्यांचाही वेळ फुकट जातो. संबंधित विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे’, असे मुंबईस्थित महाविद्यालयांतील एका शिक्षकाने सांगितले. ‘कोणतीही स्पष्ट सूचना नसल्यामुळे सुट्टीबाबत महाविद्यालयांमध्ये संभ्रम होता. सोमवारी रात्री १२ वाजता मंगळवारी ऑनलाईन तासिका घेणार असल्याचा संदेश महाविद्यालयाकडून देण्यात आला, असे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने सांगितले.

हेही वाचा : बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ३५ टक्के गाड्या

‘आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून अतिवृष्टीचा इशारा असतानाही महाविद्यालय व विद्यापीठाकडून स्पष्ट सूचना न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रचंड पावसात महाविद्यालयांत जाऊन घरी परतावे लागले. मुंबई विद्यापीठ, महानगरपालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी योग्य तो समन्वय साधून विद्यार्थ्यांना आगाऊ सूचना देण्याची कार्यपद्धती ठरवावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रचंड पाऊस असताना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही’, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई यांनी सांगितले.

2024-07-09T17:51:47Z dg43tfdfdgfd