KDMC RECRUITMENT 2025: 'केडीएमसी'त महानोकरभरती! कल्याण-डोंबिवली महापालिकेत १०७६ जागांसाठी भरती प्रक्रिया, वाचा सविस्तर

Kalyan Dombivali Municipal Corporation Recruitment 2025 : सुमारे तीन हजार कोटींची उलाढाल असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत कर्मचाऱ्यांची वेगाने निवृत्ती होत असताना, त्याप्रमाणात कर्मचारी नसल्याने प्रशासनाची ओढाताण होत आहे. नव्या आकृती बंधानुसार राज्य शासनाकडून २०२१मध्ये ७५७ कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली होती. मात्र, मागील चार वर्षांच्या काळात पालिकेतील ३०० हून अधिक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यामुळेच प्रशासनाकडून १,०७६ जागांसाठी महानोकरभरतीचे नियोजन करण्यात आले आहे.

अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भरतीची जाहिरात आलेली आहे. त्याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे -

अर्ज करण्यास सुरुवात : १० जून २०२५

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जुलै २०२५

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2025: सविस्तर जाहिरात : https://cdn3.digialm.com//

सन १९९५ नंतर होणारी ही पहिलीच मेगाभरती असून, टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याबाबत नुकतीच पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आढावा बैठक घेतली. कल्याण-डोंबिवली महापालिकेत १९९५मध्ये शेवटची नोकरभरती करण्यात आली होती. यानंतर पालिकेत काही जागांवर अनुकंपा तत्त्वावर कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. तर आकृती बंध मंजूर झाल्यानंतर पालिकेत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत काही रिक्त जागा भरण्यात आल्या. मात्र, तरीही पालिकेत कर्मचाऱ्यांची वानवा आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांपासून आरोग्य विभागातील डॉक्टर आणि तृतीय, चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपासून ते लिपिकपर्यंतच्या निम्म्याहून जागा रिक्त असल्याने प्रशासनाचा गाडा हाकताना दमछाक होत आहे. यामुळेच आकृती बंध मंजूर करत,

नोकरभरतीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी होत होती.

बारावी परीक्षेचा निकाल पाहा - Maharashtra HSC Result 2025 LIVE

राज्य शासनाने पालिकेचा आकृतीबंध २०२१मध्ये मंजूर करत ७५७ जागा भरण्यासाठी परवानगी दिली असली, तरी पालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने या नोकरभरतीला विरोध करण्यात आला. महासभेची मान्यता घेऊनच ही प्रक्रिया राबवण्याची मागणी लोकप्रतिनिधीकडून करण्यात आल्यानंतर मागील तीन वर्षांपासून नोकरभरती प्रलंबित आहे. एकीकडे इतर महापालिकांमध्ये आकृती बंधानुसार रिक्त जागांवर कर्मचारी भरती करण्यात आली असली, तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेत मात्र २५ वर्षांपासून भरती प्रलंबित आहे. यामुळेच शासकीय नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या एका पिढीतील तरुणाईला नोकरीला मुकावे लागले आहे. मात्र, आता पालिका प्रशासनाकडून नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सर्व विभागांतील एकूण १,०७६ जागांवर कर्मचारी भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी शासन मान्यता असलेल्या 'टीसीएस' मार्फत ऑनलाइन पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध करून ही भरती केली जाणार आहे. यासाठी शुक्रवारी २ मे रोजी आयुक्तांनी बैठक घेत यात भरती प्रक्रियेची रूपरेषा ठरवण्यात आली.

HSC Result 2025: परीक्षा क्रमांकावरून बारावीचा निकाल कसा पाहायचा? जाणून घ्या सोपी पद्धत

दरम्यान, शासकीय नोकरभरतीची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणांना यामुळे नोकरीची संधी उपलब्ध होणार असली, तरी यात मोठा घोडेबाजार रंगण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. पालिकेत अजूनही प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधींकडून महासभेच्या स्थापनेनंतर ही भरती केली जावी, अशी मागणी होत आहे. मात्र, मागील चार वर्षांत न झालेल्या निवडणुकांमुळे पालिकेतील लांबलेली प्रशासकीय राजवट यामुळे पालिकेतील रिक्तपदांची संख्या वाढत असल्याने शासनाच्या मान्यतेने भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भरतीची माहिती, उपलब्ध जागा, ऑनलाइन अर्ज ही माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली

आमिषाला बळी पडू नका !

पालिकेत नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच, ही ही नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गरजू तरुणांना लुबाडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, ही भरती ऑनलाइन पद्धतीने निकष तपासूनच केली जाणार असल्याने तरुणांनी रीतसर नोकरीसाठी अर्ज करून मुलाखत, लेखी परीक्षेला सामोरे जावे, कोणत्याही आमिषाला बळी पडून आर्थिक फसवणुकीचे बळी होऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

2025-05-04T15:42:57Z