ते कोण होते माहिती नव्हतं... देशातल्या बड्या नेत्यानं दिलेली राज्यसभेची ऑफर; ममता कुलकर्णीचा मोठा दावा

मुंबई: अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं तिच्या करिअरमधल्या वादग्रस्त घटना, राजकारण या सगळ्यावर आता एका मुलाखतीत भाष्य केलंय. या मुलाखतीत तिनं अनेक खुलासे केले आहेत.

तर ममतानं तिच्या बिहार दौऱ्यावरही भाष्य केलंय. ममतानं दावा केलाय की, RJD नेता आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी तिला राज्यसभेच्या सीटची ऑफर दिली होती. ममता 'आप की अदालत' या शोमध्ये सहभागी झाली होती. तिनं तिच्या बिहारच्या दौऱ्याबद्दलही भाष्य केलं. एका कार्यक्रमासाठी गोव्यात असताना, त्याच्या सेक्रेटरीनं सांगितलं की, आपल्याला लगेच एका दुसर्‍या कार्यक्रमासाठी बिहारला जावं लागणार आहे.

बिहारमध्ये काय होणार, हे मला काहीच माहिती नव्हतं. मी आणि माझ्या टीममधील १० जणांनी बिहारसाठी फ्लाइट घेतली. तिथं गेल्यानंतर या दौऱ्याचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांची कार एका नक्षलग्रस्त भागातून गेली होती. ममतानं कारच्या ड्रायव्हरला एका ठिकाणी थांबायला सांगितलं, पण ड्रायव्हरनं नकार दिला. नक्षलग्रस्त भागात आहोत, इथं थांबता येणार नसल्याचं ड्रायव्हरनं सांगितलं. यानंतर मला एकच घाम फुटला होता. मी खूप घाबरले होते... असंही ममता यांनी म्हटलं.

हॉटेलवर पोहोचल्यानंतरही कडक सुरक्षाव्यवस्था होती,नेहमीपेक्षा काही वेगळं वातावरण होतं. जवळपास आर्मीचे १०० जवान तिथं होते. आणि कार्यक्रमस्थळी पोहोचले तेव्हा तर मी आणखी घाबरले होते. ड्रेसिंग रुममध्ये प्रचंड गर्दी, तयार व्हायलाही जागा नव्हती. मी सेक्रेटरीला विचारलं, बिहारमध्ये का शो ठेवलाय?

या दरम्यान, इथून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप मी करत राहिले, असंही ममतानं सांगितलं. कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा आम्ही परत येण्यासाठी विमानात बसलो, तेव्हा सुटकेचा निश्वास सोडला, असंही तिनं सांगितलं.

या सगळ्यानंतर मीडियात चर्चा सुरू झाली. लालू प्रसाद यादव यांना समोर े स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. हे सगळं घडल्यानंतरही लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल मला फार काही माहिती नव्हतं, पण जेव्हा त्यांनी मला राज्यसभेच्या सीटची ऑफर दिली, तेव्हा त्यांचं राजकारणातील वजन किती आहे, हे समजलं. त्यांनी मला राज्यसभेची ऑफर दिलेली, पण मी मला राजकारणात रस नसल्याचं सांगितलं होतं. तेव्हाही राजकारणात रस नव्हता आणि आत्ताही नाहीये...असंही ममतानं स्पष्ट केलं.

2025-02-05T05:28:41Z